Ad will apear here
Next
‘माझे जीवनगाणे’
ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
......
आज (२९ एप्रिल २०१८) या देहाला ७२ वर्षे पूर्ण झाली. आपले मन मात्र सदैव तरुणच असते. आपल्यातला ‘मी’ किंवा ‘अहं’ तर सदैव जागृत आणि तत्पर! आता ‘मागे वळून बघताना’ ठळक अशा घटना नुकत्याच होऊन गेल्यासारख्या वाटतात. अगदी लहानपणीच्या गोष्टीसुद्धा. ‘कुहू कुहू बोले’सारखे अनेक रागांवर आधारित गाणे असते, त्याप्रमाणे अनेक उद्योग-घटनांनी भरलेले आपल्या जीवनातील चढउतार हे द्रुत-विलंबित ख्यालाप्रमाणे एकाच आनंदाने अनुभवले पाहिजेत, हे लक्षात येते.

माझे लहानपण पुण्यात, सदाशिव पेठेत गेले. घर भरत नाट्यमंदिराजवळ आणि पेरुगेट भावेस्कूल शाळा.... पाच मिनिटांच्या अंतरावर. घंटा ऐकू आल्यावर घरून निघाले तरी चालायचे. त्या वेळी फक्त रेडिओच होता. सनईचे सूर आणि भक्तिगीते ऐकत झोपेतून उठायचे. अगदी बालपणापासून असे संगीताचे संस्कार झाले. त्यामुळे निर्गुण आनंद, कोमल भावना आणि उदात्तता या गोष्टी अंगात भिनल्या.

आई-वडील दोघेही धार्मिक आणि सत्प्रवृत्त. ते संस्कार आमच्यावरही झाले. घरात धार्मिक वाङ्‌मय आणि ज्योतिष विषयाची पुस्तके भरपूर. रामायण, महाभारत, पुराणे इत्यादींच्या वाचनाने मन हळूहळू प्रगल्भ होत गेले. समोरच नाटकाचे थिएटर. त्यामुळे संगीत नाटकांपासून राज्य नाट्यस्पर्धांपर्यंतच्या कार्यक्रमांना नियमित हजेरी होती. त्यात सिनेमाचे वेड सहावीपासूनच लागले. ‘आतला’ लेखक घडायला लागला. अभ्यासात वाईट नव्हतो. शाळा आणि महाविद्यालयात नाटकातून कामे सुरू झाली. 

‘एमईएस’ कॉलेजात ‘एफवाय’ला असताना विक्रम गोखलेबरोबर ‘प्रेमा तुझा रंग कसा’मध्ये भूमिका केली. नाटक खूप गाजले. त्याचे पाच-सहा प्रयोग झाले. ‘वाळवेकर ट्रॉफी’ मिळाली. दिग्दर्शक होते भालबांचे बंधू खंडेराव केळकर. फारच धमाल आली. पुढे बाबा आमट्यांची पुस्तके वाचून वरोऱ्याला आनंदवनात (पळून) गेलो. १९६७मध्ये बिहारला भीषण दुष्काळ पडला. ‘युवक क्रांती दलातर्फे’ तिथे जाऊन मुला-बायकांसाठी एक वेळचे अन्न केंद्र चालवले. ‘रिलीफ कमिटी’ जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती. देशभरातल्या अनेक मोठमोठ्या लोकांना भेटता आले. सामाजिक जाणीव आणि कार्याचे महत्त्व समजले. व्यक्तिगत संकुचितपणा समूळ नष्ट झाला.

पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून बीए (गणित) पूर्ण झाले. लहानसहान नोकऱ्या अल्पकाळासाठी सुरू झाल्या, निदान आपला खर्च तरी भागवता यावा म्हणून! सन १९७३ डिसेंबरमध्ये पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह मिळाला. ‘सोऽहं’ साधना  सुरू झाली. आंतरिक प्रगतीचा एक मार्ग! २७-२८ वर्षांपर्यंतचा हा कालखंड.

पत्नीसह रवींद्र गुर्जरआमच्या मातोश्रींचे माहेर नगर जिल्ह्यातील कर्जत. घरी मुलींनी फार शिकण्याची प्रथा नव्हती. म्हणून ती चौथीपर्यंतच पोहोचली. परंतु तिला शिक्षणाची भयंकर आवड. थोरल्या वकील भावाकडून तिने ‘तर्खडकरां’चे सर्व भाग शिकून घेतले. इंग्रजी भाषांतराचे धडे. (मी पुढे अनुवादक झालो.) तिने हिंदीचे ‘कोविद’पर्यंत शिक्षण घेतले. तिला जास्त शिकता आले नाही; पण तिची मुले- नातवंडे सर्व उच्चशिक्षित झाली. आमच्या घराण्यात पाच जण पीएचडी, दोन जण एम. फिल., तर बाकी सगळे जण द्विपदवीधर झाले. मीसुद्धा एकूण चार पदव्या घेतल्या (प्री पीएचडीपर्यंत) आणि इतर अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले.

पॅपिलॉनऑक्टोबर ७५मध्ये ‘पॅपिलॉन’ हे माझे पहिले अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले. एक नवा ‘टर्निंग पॉइंट!’ एकाच पुस्तकाच्या पुण्याईवर (कुठलीही नोकरी नसताना) रत्नागिरीच्या पं. पुरुषोत्तमशास्त्री फडक्यांची मुलगी पत्नी म्हणून प्राप्त झाली. ‘योगक्षेमं वहाम्यहं’ म्हणतात ना, तशी देवाला काळजी! तिने घरसंसार निभावून नेला. शिक्षक आणि लेखकांना आर्थिक प्राप्ती फार होत नाही. (आता परिस्थिती बदलली आहे; पण तौलनिकदृष्ट्या अन्य क्षेत्रांपेक्षा उत्पन्न कमीच असते.) त्यामुळे बाचाबाची, वादविवाद होत आलेच; पण ते घरोघर चालतात. त्याचा उत्पन्नाशी काही संबंध नसतो. नवरा-बायकोचा तो जन्मसिद्ध हक्क असतो. रवींद्र पिंगे यांचे एक वाक्य या संदर्भात फार बोलके आहे. ते म्हणत, की ‘आपली बायको ती आपली बायको. दुसऱ्याच्या बायकोचा आपल्याला काहीही उपयोग नसतो!’

आणखी एक वाक्य असेच प्रत्ययकारी आहे. ‘पॅपिलॉन’ प्रसिद्ध होत असताना राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर म्हणाले होते, ‘गाडी-बंगल्यापलीकडे एक श्रीमंती असते. तुम्ही श्रीमंत व्हाल!’ आणि खरोखर, मी म्हणतो की कुबेरालाही लाजवेल अशी श्रीमंती प्राप्त झाली. हजारो मित्र आणि लाखो वाचक निर्माण झाले. सगळीकडे आदर-सत्कार होत आले. प्रस्तुत जीवनातच ‘कीर्तिरूपे उरलो!’

Take life as it comes! जीवनाला खुल्या मनाने सामोरे जा. खरोखर, आयुष्यात इतक्या गोष्टी घडल्या. अनेक क्षेत्रांशी संबंध आला. जणू काही सगळे पूर्वनियोजित असावे, त्याप्रमाणे घटना घडतात. माणसाला निर्णयस्वातंत्र्य आहे. परंतु कित्येक वेळा सर्व बाजूंनी परिस्थिती अशी असते, की आपोआप एखाद्या कामाकडे आपण ओढले जातो. विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवणे मात्र आवश्यक. ज्या कामात अडचणी येतील, प्रतिकूलता असेल ते शक्यतो लवकर सोडून देणे हिताचे असते. सात्त्विक स्वरूपाची आणि आवश्यक ती कामे, अगदी सारे जग विरोधात उभे ठाकले तरी पूर्ण करायचीच! सतत कार्यमग्न असणे आजारपणाला दूर ठेवते. गुरूंचा आणि दैवी आशीर्वाद पाठीशी असतोच.

गुर्जर दाम्पत्याच्या मुली - गायत्री आणि रश्मीआमचे घर पुस्तकांनी समृद्ध आहे. हजारो पुस्तके. बरेच लोक येणार असतील तर, आवराआवर करून बसायला जागा करावी लागते. नवीन खरेदी बंद करायचे ठरवले, तरी पुस्तकांची या ना त्या प्रकारे भर पडतच राहते. मित्रांना आणि ग्रंथालयांना पुस्तके भेट देत राहतो. वयाच्या सत्तरीनंतर त्यांची व्यवस्था लावणे आवश्यकता असते. ‘नवीन ग्रंथालये सुरू करण्यासाठी आपल्या घरातील पुस्तके भेट द्या,’ असे आवाहन केले तर लाखो पुस्तके गोळा होतील. असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. आगामी वर्षात माझाही तो एक उपक्रम असणार आहे. ज्यांना तशी इच्छा आहे, त्यांनी खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.

आतापर्यंत अनेक मासिकांचे संपादन केले. अलीकडे नव्यानेच ‘विश्व पांथस्थ’ या खास अनिवासी भारतीयांसाठी काढलेल्या मासिकाचा कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. ज्या कामांचा आपल्याला चांगला अनुभव आहे, ते करण्यात खूपच आनंद असतो. अजूनही कितीतरी कामे करण्याची इच्छा आहे. अनुकूल संधी आणि वातावरण निर्माण व्हायला पाहिजे - आणि ते होते.

नाटक-सिनेमाची लहानपणापासून प्रचंड आवड. चित्रपट तर हजारोंनी बघितले, अजूनही बघतो. दर शुक्रवारी बदलणाऱ्या (आणि त्यातील बघायच्या) चित्रपटांची यादी, थिएटर्स आणि वेळांसह लिहून माझ्या खिशात ठेवलेली असते. इयत्ता सहावीत प्रभात स्टुडिओने (सध्याची फिल्म इन्स्टिट्यूट) काढलेला अखेरचा हिंदी चित्रपट ‘गजगौरी’, त्यात मी एका कौरवाचे काम केले होते. महिनाभर शाळेला दांडी! ऑक्टोबर २०१६मध्ये अचानक एका मराठी चित्रपटात ४-५ मिनिटांची छोटी भूमिका करण्याचा योग आला. ‘चरणदास चोर’ त्याचे नाव. सगळे कलाकार नवीन होते. शाळेतील गुरुजी आणि कबड्डी कोच (!) असे माझे काम होते.

गेल्या वर्षी पटकथा लेखनाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या एका कथा-पटकथेचे काम सुरू केले आहे. येता दोन आठवड्यात स्पर्धेसाठी एका ‘शॉर्टफिल्म’ची निर्मिती करणार आहे. ‘सब कुछ पुल’प्रमाणे ‘सबकुछ मी!’ बघा! ‘मी’ सारखा बाहेर येतोच!

जुन्या काळी तीन मिनिटांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका असायच्या. तसे हे ठुमरी-दादऱ्यासारखे ‘माझे जीवनगाणे!’  विलंबित-द्रुत खयाल वेळोवेळी गायलेला आहे. म्हणून आता इतके आलाप पुरे! 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(रवींद्र गुर्जर यांची साहित्यसंपदा घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. गुर्जर यांची साहित्यिक भूमिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZKUBN
 बाबा,
मि तुमच्या बरोबर काही काळ राहिल्या मुळे , तुमच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग मी जवळून अनूभवले आहेत.
तुमच्या पूढील प्रवासाठी मनःपूर्वक शूभेच्छा.!💐💐
 हार्दिक शुभेच्छा
Similar Posts
दृक्-श्राव्य लेखन ‘किमया’ म्हणजे चमत्कार किंवा परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होणे. एखादे पुस्तक वाचल्यामुळे, काही घटना घडल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. कालिदासाला संस्कृत येत नसल्यामुळे पत्नीने निर्भर्त्सना केल्यावर तो तिरमिरीत घराबाहेर पडला, प्रचंड अभ्यास केला आणि जगाला एक महान नाटककार मिळाला. ‘बरसात’ या आपल्या चित्रपटाला
आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर इंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर याचा जन्म व मृत्यूचा दिनांक २३ एप्रिल हाच आहे. जागतिक पुस्तक दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने, ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरातून शेक्सपिअरला वाहिलेली ही आदरांजली...
माझा अनवट मित्र हिरालाल! ‘किमया’ सदरात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर आज सांगत आहेत हिरालाल या त्यांच्या अनवट मित्राची गोष्ट...
माझी साहित्यिक भूमिका गेली सुमारे ४५ वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ अनुवादक आणि लेखक रवींद्र वसंत गुर्जर आज, २९ एप्रिल रोजी ७२व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language